PPF Investment Tips – दीर्घकालीन गुंतवणुकीचा खरा फायदा हा चक्रवाढ व्याजामधूनच मिळतो. यातही सुरक्षित गुंतवणूक म्हटले की पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच PPF हा उत्तम पर्याय मानला जातो. जर तुम्ही PPF मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. वास्तविक, या फंडामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महिन्याची 5 तारीख अत्यंत महत्त्वाची आहे.
PPF सुरक्षित गुंतवणुकीचा उत्तम पर्याय
बहुतेक व्यावसायिक कर बचतीसाठी PPF हा गुंतवणुकीचा पर्याय निवडतात. पण, यामध्ये देखील तुम्ही हुशारीने पैसे गुंतवले तर तुम्हाला चांगला परतावा मिळत असतो. PPF मध्ये तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळतो. यामध्ये जर तुम्ही मासिक गुंतवणूक करत असाल तर महिन्याच्या 5 तारखेपर्यंत पैसे जमा करा, म्हणजे तुम्हाला त्या महिन्याचे व्याज देखील मिळेल.
PPF मधील गुंतवणुकी बरोबरच मॅच्युरिटी रक्कम आणि व्याजही करमुक्त आहे. सुरक्षित गुंतवणूक आणि दीर्घ मुदतीसाठी मोठा निधी मिळवण्यासाठी हा एक उत्तम मार्ग आहे. PPF खात्यामधील गुंतवणुकीवर कलम 80C अंतर्गत 1.50 लाख रुपयांपर्यंत कर सवलत मिळू शकते.
गुंतवणुकीसाठी महिन्याची 5 तारीख महत्त्वाची
तुम्ही प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस PPF मध्ये एकरकमी गुंतवणूक करत असाल, तर 5 एप्रिलपर्यंत केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी अधिक फायदा मिळवून देऊ शकते. PPF खात्यामध्ये दर महिन्याच्या 5 तारखेला व्याज मोजले जाते. याचा अर्थ स्पष्ट होतो की जर तुम्ही प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सुरुवातीच्या 5 एप्रिलपर्यंत एकरकमी रक्कम जमा केली तर त्यावेळी तुम्हाला संपूर्ण महिन्यासाठी व्याजाचा फायदा मिळू शकतो.
जर एखाद्या व्यक्तीने महिन्याच्या 5 तारखेपर्यंत PPF खात्यामध्ये गुंतवणूक केली तर त्याला जमा केलेल्या रकमेवर संपूर्ण महिन्यासाठी व्याजाचा लाभ मिळतो. जर 5 तारखेनंतर गुंतवणूक केली असल्यास त्यावेळी तुम्हाला 5 ते 20 तारखेदरम्यान सर्वात कमी शिल्लक रकमेवरच व्याजाचा लाभ मिळू शकतो.
गणित समजून घ्या
PPF खात्यावरील व्याजाची गणना मासिक आधारावर करण्यात येते. याचा लाभ प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी खात्यामध्ये जमा करण्यात येतो. जर तुम्ही तुमच्या PPF खात्यात 5 एप्रिलपूर्वी 1.5 लाख रुपये जमा केले, तर त्या महिन्याचे व्याज मोजण्यासाठी संपूर्ण रक्कम विचारात घेतली जाते. याचा अर्थ, सध्याच्या 7.1% व्याजदरावर आधारित, तुम्हाला वार्षिक 10,650 रुपये व्याज दिले जाईल.
मात्र, तुम्ही 5 एप्रिलनंतर पैसे जमा केले, तर यावेळी तुम्हाला पहिल्या महिन्याचे व्याज मिळत नाही. याचा अर्थ एप्रिल वगळता आर्थिक वर्षाच्या फक्त 11 महिन्यांसाठीच तुम्हाला व्याज मिळेल, व्याजदरानुसार गणना केल्यास 1.5 लाख रुपयांच्या ठेवीवर 9762.50 रुपये रक्कम होईल.