loan guarantor responsibilities: आपण आपल्या कुटुंबातील सदस्य, मित्र किंवा जवळच्या व्यक्तींच्या अडचणीच्या काळात मदतीसाठी तत्पर असतो. अशावेळी एखाद्या नातलगाला किंवा मित्राला कर्जासाठी ‘जामीनदार’ होणे, ही आपल्याकडे फार सामान्य गोष्ट मानली जाते. आपुलकी, विश्वास आणि नातेसंबंध यामुळे आपण कधी-कधी कोणतीही विचारणा न करता या जबाबदारीस होकार देतो. पण खरंच, जामीनदार होणे एवढं सहज आणि साधं आहे का?
जामीनदार म्हणजे नेमकं काय? (loan guarantor responsibilities)
जामीनदार म्हणजे कर्ज घेणाऱ्या व्यक्तीकडून कर्जाची परतफेड न झाल्यास, बँकेला ती रक्कम तुमच्याकडून (हमीदाराकडून) वसूल करता येईल अशी हमी देणारी व्यक्ती. म्हणजेच, ज्या व्यक्तीच्या कर्जासाठी तुम्ही हमी देता, जर त्या व्यक्तीने वेळेवर कर्ज फेडले नाही, तर बँक थेट तुमच्याकडे वळते
जामीनदार झाल्यानंतर तुमच्या क्रेडिट स्कोअरवर काय परिणाम होतो? (Guarantor impact on credit score)
जामीनदार होणे ही एक ‘बॅकअप’ जबाबदारी आहे. कर्ज घेतलेली व्यक्ती जर हप्ते भरण्यात अयशस्वी ठरली, तर बँक तुम्हाला प्रथम नोटीस पाठवते. बँकेच्या दृष्टीने, तुम्ही दोघेही (कर्जदार आणि हमीदार) कर्जाच्या परतफेडीसाठी जबाबदार असता. कर्जदाराने हप्ते भरले नाहीत किंवा कर्ज बुडवले, तर याचा परिणाम तुमच्या क्रेडिट स्कोअरवर थेट होतो. याचा अर्थ, भविष्यात तुम्ही स्वत:साठी कर्ज घेण्याचा प्रयत्न केला, तर बँक तुमचा क्रेडिट स्कोअर लक्षात घेऊन कर्ज नाकारू शकते, किंवा जास्त व्याजदराने मंजूर करू शकते
कर्जदार दिवाळखोर झाला, तर पूर्ण जबाबदारी तुमच्यावर! (loan default legal action on guarantor)
ही गोष्ट सर्वात धक्कादायक असते. कधी कधी कर्जदार आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडतो आणि दिवाळखोरी घोषित करतो. अशा परिस्थितीत, कायद्याच्या भाषेत त्याला कर्ज फेडण्यापासून काही प्रमाणात सूट मिळू शकते. पण, जामीनदाराला मात्र ही सूट लागू होत नाही. त्यामुळे, कर्जाची संपूर्ण रक्कम, व्याजासह, बँक तुमच्याकडून वसूल करण्याचा पूर्ण अधिकार ठेवते. इतकंच नाही, तर जोपर्यंत कर्ज फेडलं जात नाही, किंवा बँकेकडून माफीचं लेखी पत्र मिळत नाही, तोपर्यंत जामीनदार म्हणून तुमची जबाबदारी कायम राहते
जामीनदार होण्याचे फायदेही आहेत… पण अटींसह! (loan guarantor Benefits)
होय, जामीनदार होण्याचे काही फायदे सुद्धा आहेत, पण जबाबदार व्यक्तीसाठीच. जर कर्जदार व्यक्ती वेळेवर हप्ते भरत असेल आणि नीट व्यवहार करत असेल, तर त्याचा तुमच्याही क्रेडिट स्कोअरवर सकारात्मक परिणाम होतो. शिवाय, तुम्ही एखाद्या प्रिय व्यक्तीच्या गरजेच्या वेळी त्याला आधार देता, याचे नैतिक समाधान देखील मिळते. पण हे फायदे केवळ तेव्हाच खरे ठरतात, जेव्हा त्या व्यक्तीवर तुमचा पूर्ण विश्वास असेल आणि त्याची आर्थिक शिस्त चांगली असेल
जामीनदार होण्यापूर्वी ‘ही’ काळजी घ्या (loan guarantor responsibilities)
• कर्जदाराची आर्थिक पार्श्वभूमी तपासा – त्याची नोकरी, उत्पन्न, कर्ज फेडण्याची सवय, आधीचा क्रेडिट स्कोअर जाणून घ्या
• कर्जाचे स्वरूप समजून घ्या – किती रक्कम आहे, परतफेडीची मुदत किती आहे, व्याजदर काय आहे?
• कायदेशीर कागदपत्रं नीट वाचा – कधी हमी संपेल, कोणत्या अटींवर माफी मिळू शकते, हे समजून घ्या
• तज्ञांचा सल्ला घ्या – आर्थिक सल्लागार किंवा चार्टर्ड अकाउंटंटची मदत घ्या
• क्रेडिट स्कोअरवर लक्ष ठेवा – दर 3 ते 6 महिन्यांनी तुमचा Credit स्कोअर तपासत रहा
loan guarantor rules
भावनांवर भरवसा ठेवून निर्णय घेणं चांगलं असलं, तरीही आर्थिक जबाबदारीला डोळेझाक करून स्वीकारणं धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे जामीनदार होण्यापूर्वी तुमचं आर्थिक भविष्य, कुटुंबाची गरज, आणि कर्जदाराची सवय यांचा नीट विचार करा. एकदा जामीनदार झालात की, त्यातून सहज माघार घेता येत नाही – हे लक्षात ठेवा.