Instant loan app fraud: आजच्या डिजिटल युगात मोबाईलमधून एका क्लिकवर मिळणाऱ्या कर्जाने अनेक गरजवंतांना तात्पुरता दिलासा दिला असला, तरी यामागे दडलेले धोके अनेक कुटुंबांचे जीवन उध्वस्त करत आहेत. झटपट कर्ज देणाऱ्या इंस्टंट लोन ॲप्सचा सध्या प्रचंड फैलाव झाला आहे. कोणत्याही मोठ्या कागदपत्रांशिवाय, काही मिनिटांत कर्ज खात्यात जमा होते आणि तेवढ्याच वेगाने सुरू होतो एक मानसिक आणि आर्थिक त्रासांचा खेळ.
झटपट पैसे… झपाट्याने अडचणीत! (Instant loan app fraud)
सध्याच्या वेगवान जीवनशैलीमध्ये, अचानक उद्भवलेला वैद्यकीय खर्च, शिक्षणाची फी, मोबाईलचा हप्ता किंवा घरखर्चासाठी लोक तत्काळ पैसे उभे करण्यासाठी इंस्टंट लोन ॲप्सकडे वळतात. हे ॲप्स 10 ते 30 मिनिटांत पैसे ट्रान्सफर करतात. त्यासाठी फक्त स्मार्टफोन, ओळखपत्र आणि फोटो पुरेसे असतात. विशेष म्हणजे काही ॲप्सना RBI (रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया) कडून परवानगी मिळालेली असते, पण बहुसंख्य ॲप्स बेकायदेशीर आणि संशयास्पद असतात.
का बळी पडतात लोक?
तज्ज्ञ सांगतात की, या ॲप्सची सर्वात मोठी चलाखी म्हणजे “कुठलाही प्रश्न न विचारता कर्ज मिळवा” ही ऑफर! जेव्हा एखाद्या गरजू व्यक्तीसमोर पैसे मिळवण्याचा दुसरा पर्याय नसतो, तेव्हा ती पटकन या आमिषाला बळी पडते.
हे ॲप्स अत्यंत उच्च व्याजदर लावतात – काही वेळा तर वार्षिक व्याजदर 200% पेक्षा अधिक असतो! परतफेडीसाठी अवघा काही दिवसांचा कालावधी दिला जातो. वेळेवर परतफेड न झाल्यास, दुसऱ्या ॲपवरून कर्ज घेण्याची वेळ येते आणि सुरू होतो एक न संपणारा कर्जचक्राचा खेळ.
मानसिक त्रास आणि ब्लॅकमेलिंगचा धोका (Digital Lending Data Misuse)
इंडिया टुडेच्या रिपोर्टमध्ये कॅशईचे सीईओ यशोराज त्यागी सांगतात की, बेकायदेशीर ॲप्सचा सर्वात मोठा धोका म्हणजे पर्सनल डेटा चा गैरवापर. एकदा तुम्ही ॲप डाऊनलोड केला की, ते तुमच्या फोनमधील कॉन्टॅक्ट लिस्ट, फोटो, लोकेशन यासारखा खाजगी डेटा घेतात. जर परतफेड लांबली, तर हे ॲप्स तुमच्या नातेवाईकांना, मित्रांना आणि सहकाऱ्यांना मेसेज पाठवून दबाव टाकतात. अशा केसेसमध्ये अनेकांनी आत्महत्येपर्यंतचा टोकाचा निर्णय घेतल्याची उदाहरणं समोर आली आहेत.
इंस्टंट लोनचे तोटे – जे समजून घेणे आवश्यक आहे (Instant loan app fraud alert)
• अत्यंत उच्च व्याज दर: 30% ते 200% पर्यंत वार्षिक व्याज.
• लपवलेले शुल्क: प्रोसेसिंग फी, उशिराची दंडात्मक रक्कम याची स्पष्ट माहिती दिली जात नाही.
• क्रेडिट स्कोअरवर परिणाम: वेळेवर परतफेड न झाल्यास तुमचा CIBIL स्कोअर खराब होतो.
• डेटाचा गैरवापर आणि ब्लॅकमेलिंग: पर्सनल फोटो, कॉन्टॅक्ट्स वापरून मानसिक त्रास.
• कायदेशीर संरक्षणाचा अभाव: RBI परवाना नसलेले ॲप्स कोणत्याही नियमनात येत नाहीत.
सुरक्षिततेसाठी काय कराल?
• फक्त RBI-मान्यताप्राप्त ॲप्सचा वापर करा. RBI ने वेळोवेळी मान्यताप्राप्त डिजिटल लेंडिंग कंपन्यांची यादी जाहीर केली आहे.
• संपूर्ण अटी आणि नियम नीट वाचा. “Terms & Conditions” वाचणं कंटाळवाणं असलं तरी तेच तुम्हाला पुढे त्रासापासून वाचवू शकतं.
• Permission मागणाऱ्या ॲप्सबाबत सावधगिरी ठेवा. जर एखादा ॲप तुमच्या गॅलरी, कॉल लिस्ट किंवा कॉन्टॅक्ट्सची परवानगी मागत असेल, तर तो धोक्याचा इशारा समजा.
• EMI भरण्याची तयारी नसेल, तर कर्ज घेणे टाळा. झटपट कर्ज घेतल्याने तात्पुरता फायदा होईल, पण दीर्घकालीन त्रास होऊ शकतो.
• शंका असल्यास तक्रार करा. अशा ॲप्सबाबत RBI किंवा सायबर क्राइम सेल्युला तक्रार नोंदवा.
Instant loan app fraud
“झटपट कर्ज” – हा सध्याच्या डिजिटल आर्थिक जमान्याचा धोकादायक ट्रेंड आहे. आपण गरजेच्या वेळी पैसे उभे करत असलो, तरी ते कोणाकडून, कशा अटींवर घेत आहोत याचा विचार करणे अत्यावश्यक आहे. आर्थिक निर्णय हा भावनेपेक्षा विचारांवर आधारित असायला हवा, अन्यथा एका चुकीच्या क्लिकमुळे संपूर्ण आयुष्य उध्वस्त होऊ शकतं. सावध राहा, सजग राहा!