Aaple Sarkar Update – आपले सरकार पोर्टलवरून शासकीय कागदपत्रांसंबंधित तुमचे कोणतेही काम असेल, तर ते आजच करून घ्या. कारण पुढील 5 दिवसांसाठी हे पोर्टल बंद राहणार आहे. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाने यासंदर्भात माहिती दिली आहे. 10 ते 14 एप्रिल पर्यंत हे पोर्टल सर्वच सेवांसाठी बंद असेल.
वेगवेगळ्या सरकारी सेवा आणि कागदपत्रांसाठी अर्ज करण्याची सुविधा असलेले हे पोर्टल आहे. परंतु, या महिन्यात तांत्रिक कारणामुळे ते 5 दिवस बंद ठेवले जाणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या विविध विभागांच्या सेवांचा लाभ सर्वसामान्य जनतेला या पोर्टलवरून उपलब्ध करून दिला जातो.
आपले सरकार पोर्टल 5 दिवस का बंद ठेवले जाणार आहे?
आपले सरकार पोर्टलसंबंधित प्रशासनाने सांगितले आहे की, सर्व्हरवरील डेटा स्थलांतर केला जाणार आहे. त्यामुळे 10 ते 14 एप्रिल 2025 या कालावधीमध्ये ‘आपले सरकार’ पोर्टल बंद ठेवले जाणार आहे. या दरम्यान पोर्टलवरील कोणतीही सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध असणार नाही. ही प्रक्रिया सर्व्हर प्रणालीची कार्यक्षमता सुधारण्यासाठी गरजेची आहे.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 नुसार ‘आपले सरकार’ हे पोर्टल विकसित केले आहे. नागरिकांना विविध शासकीय सेवांसाठी कार्यालयांच्या फेऱ्या कमी करण्याच्या उद्देशाने हे पोर्टल सुरू केले आहे.
आपले सरकार पोर्टलवरून सर्वच कामासाठी आवश्यक असणाऱ्या शासकीय प्रमाणपत्रे (जसे की उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रे) मिळवण्यासाठी नागरिकांना या पोर्टलवरून अर्ज करता येतो. त्यासोबतच शासकीय सेवांची माहितीही घेता येते.