Pandharpur Wari 2025 Special Bus Service: आषाढी एकादशी म्हटलं की संपूर्ण महाराष्ट्राचं मन पंढरपूरकडे धाव घेतं. विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविक दरवर्षी पंढरपूरची वारी करतात. यंदाही आषाढी यात्रेचा भव्य आणि दिव्य सोहळा उत्साहात पार पडला. वारीत पायी सहभागी होणाऱ्यांची संख्या मोठी असली, तरी जे भाविक स्वतः प्रत्यक्ष वारीत सहभागी होऊ शकले नाहीत, त्यांच्या सेवेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची “लालपरी” अर्थात एस.टी. धावून आली – आणि यावेळी ती केवळ सेवा देऊन थांबली नाही, तर तब्बल 35 कोटी 87 लाख 61 हजार रुपयांचे उत्पन्न कमावून आली
5200 जादा बसगाड्यांची सोय – सुरक्षित देवदर्शन
राज्यभरातून पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांसाठी एसटीने यंदा विशेष नियोजन करत 5200 जादा बसगाड्या उपलब्ध करून दिल्या. या बसेसद्वारे 3 ते 10 जुलै या कालावधीत एकूण 21,499 फेर्या करण्यात आल्या आणि त्याद्वारे 9 लाख 71 हजार 683 भाविक प्रवाशांना सुखरूप देवदर्शनासाठी ने-आण करण्यात आले
परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सोहळ्याच्या माध्यमातून महामंडळाला मिळालेलं उत्पन्न हे गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 6 कोटी 96 लाख 3 हजार रुपयांनी अधिक आहे. मागील वर्षी (2024) आषाढी यात्रेदरम्यान महामंडळाचे उत्पन्न 28 कोटी 91 लाख 58 हजार रुपये इतके होते
लाखो भाविकांना सेवा, हजारो कर्मचाऱ्यांची मेहनत
या यशामागे एसटी महामंडळाचे हजारो चालक, वाहक, यांत्रिकी कर्मचारी, पर्यवेक्षक व अधिकाऱ्यांची अथक मेहनत आणि समर्पण आहे. प्रचंड गर्दी, हवामानातील बदल, मार्गावरील अडथळे असूनही ही सेवा सुरळीत ठेवण्यात आली – हे निश्चितच कौतुकास्पद आहे. मंत्री सरनाईक यांनीही या सर्व कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक करत त्यांचे अभिनंदन केलं
मोफत भोजनसेवा – कर्मचाऱ्यांसाठी विशेष सुविधा
वारीत सहभागी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांना जेवणाची अडचण होऊ नये, म्हणून प्रताप सरनाईक यांनी 5, 6 आणि 7 जुलै रोजी स्वखर्चातून मोफत जेवण, चहा व नाष्टा पुरवण्याची व्यवस्था केली होती. याचा लाभ हजारो कर्मचाऱ्यांनी घेतला
Pandharpur Wari 2025 Special Bus Service
आषाढी यात्रेच्या निमित्ताने एसटी महामंडळाने केवळ आर्थिक दृष्टिकोनातून नव्हे, तर सेवा, व्यवस्थापन आणि मानवतावादी दृष्टिकोनातूनही एक उत्तम आदर्श उभा केला आहे. लाखो भाविकांचे सुखरूप दर्शन पार पाडणं आणि त्याचवेळी महामंडळाचं उत्पन्नही वाढवणं – ही दुहेरी कामगिरी यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल एसटीच्या संपूर्ण टीमचे मन:पूर्वक अभिनंदन!