Maharashtra Weather Update – राज्यात उन्हाचा ताप वाढत असल्यामुळे पावसाला पोषक वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे, अनेक भागात पावसाची हजेरी लागेल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान मुंबईतही पावसाळी वातावरण निर्माण होऊन पुढील 1-2 दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
विदर्भामधील काही भागांत अजुनही उष्णतेचे प्रमाण कायम आहे. राज्यातील अनेक भागांत आता पावसाची हजेरी लागेल, त्यामुळे उकाड्याचे प्रमाण कमी होऊ शकते. पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरामध्ये सक्रिय असलेला कमी दाबाचा पट्टा निवळला आहे. परंतु राजस्थानच्या पश्चिमेपासून विदर्भाच्या उत्तरेपर्यंतचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. या स्थितिमुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
पावसाचा अंदाज कुठे
नंदुरबार, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या भागांमध्ये आज आणि उद्या मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. लातूर, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या भागांमध्ये सोमवार नंतर पाऊस जोर धरेल. यावेळी वाऱ्याचा वेग 30 ते 40 किमी प्रतितास असणार आहे.
किनारपट्टीवरही पावसाचा अंदाज
कोकणातील मुंबईसह सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
उन्हाचा चटका कायम
राज्यात पावसाळी वातावरणा सोबतच उन्हाचा चटका कायम आहे. काही कालावधीसाठी पाऊस पडल्यानंतर तापमानात घट होत असली तरी, त्यानंतर तापमानात पुन्हा वाढ होत आहे. राज्यांच्या बहुतांशी भागात तापमानाचा पारा अजूनही 40 अंशावरच आहे. किनारपट्टीवरच्या तापमानात काही दिवसांपासून घट झाली आहे, आणि ही घट मागील काही दिवसांपासून तशीच आहे.
उन्हाळी पाऊस आणि मोसमी पाऊस यांत फरक काय?
• उन्हाळी पावसाच्या कालावधीमध्ये दिवसभर खूप उकडते, हा उकाडा असह्य होतो आणि मग पाऊस कोसळतो. मोसमी पावसाच्या कालावधीमध्ये ढग जमा होतात. ऊन आणि सावली यांचा खेळ सुरु होतो, काहीवेळा संथ वाराही वाहतो आणि मग हा पाऊस पडतो.
• उन्हाळी पावसाच्या कालावधीमध्ये उष्णतेमुळे ढग निर्माण होतात. वारा खालून वर जातो आणि बाष्प साठून पाऊस पडतो. मोसमी पावसादरम्यान ढग जमिनीला समांतर दिशेने पुढे पुढे सरकतात आणि पाऊस पडायला सुरुवात होते.
• उन्हाळी पाऊस गडगडाटी, आणि रौद्र स्वरुपामध्ये असतो. मोसमी पाऊस संततधार, संथ आणि शांतपणे येत असतो.