Government GR on Paid Leave for Elections: राज्यातील सर्व सरकारी तसेच खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना 02 डिसेंबर 2025 रोजी भरपगारी सुट्टी देण्याबाबत उद्योग, उर्जा व खनिकर्म विभागाने दिनांक 28 नोव्हेंबर 2025 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) जारी केला आहे. राज्यातील ठराविक मतदान क्षेत्रांत होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष व्यवस्था
या GR नुसार, संबंधित मतदान क्षेत्रात नोंद असलेल्या कामगार, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देणे बंधनकारक करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे कर्मचारी कार्यक्षेत्राबाहेर किंवा इतर जिल्ह्यात कार्यरत असले तरीही 2 डिसेंबरच्या दिवशी सुट्टी दिलीच पाहिजे, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांना लागू
हा निर्णय राज्यातील ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व खाजगी आस्थापनांवर बंधनकारक आहे. यामध्ये दुकाने, हॉटेल, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापारी प्रतिष्ठाने, तंत्रज्ञान कंपन्या, आयटी फर्म्स, सर्व प्रकारचे व्यापार उपक्रम, शॉपिंग मॉल्स आणि रिटेल स्टोअर्स यांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी देणे आवश्यक आहे.
ज्या ठिकाणी पूर्ण दिवस सुट्टी शक्य नाही तिथे विशेष सवलत
ज्या ठिकाणी सुट्टी दिल्यास मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते किंवा ज्या सेवा लोकोपयोगी अथवा अत्यावश्यक स्वरूपाच्या आहेत, उदा. धोकादायक प्रक्रिया, सतत चालणारे कारखाने किंवा आपत्कालीन सेवा, अशा ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसल्यास किमान 2 ते 3 तासांची मतदानासाठी विशेष सवलत देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
निर्णयाचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई
जर कोणत्याही आस्थापनाने कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी दिली नाही, मतदानासाठी सवलत दिली नाही किंवा यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांना मतदान करता आले नाही, तर अशा आस्थापनेविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असा शासनाचा स्पष्ट इशारा आहे. कर्मचाऱ्यांकडून आलेल्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही केली जाईल.

➡️ जन्म-मृत्यू प्रमाणपत्र काढताना पुरावा म्हणून आधार कार्ड चालणार नाही; राज्य सरकारचा मोठा निर्णय
