Home Loan Tips – सध्या शहरांमध्ये घर खरेदी करायचे झाल्यास आपल्याकडे लाखो रुपयांची रक्कम असणे आवश्यक असतं. मात्र, प्रत्येकाकडे एकाच वेळी घराची पूर्णपणे किंमत देऊन घर खरेदी करण्याइतकी रक्कम असत नाही. त्यामुळे त्यांना गृहकर्ज काढून घर खरेदी करावे लागते. सध्या भारतात घर खरेदीसाठी 8.10 ते 12% व्याजाने गृहकर्ज मिळते. गृहकर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा सिबिल स्कोअर आणि संबंधित संस्थेची आर्थिक स्थिती यावर कर्ज किती व्याज दरानं उपलब्ध होईल हे ठरते.
मात्र, एखाद्या व्यक्तीला गृहकर्ज घ्यायचं झाल्यास कोणत्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे हे त्यांना माहित असणं आवश्यक आहे. त्यामध्ये पगाराची रक्कम, कर्जाची मर्यादा, आपत्कालीन निधी, यासह गृहकर्ज संबंधित इतर गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे.
गृहकर्ज घेताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात?
गृहकर्ज घेतेवेळी आपल्याकडे किमान 5 ते 6 महिन्यांच्या पगाराइतकी रक्कम आपत्कालीन निधी म्हणून शिल्लक असायला हवी. गृहकर्जाचा (Home Loan) कालावधी हा किमान 20 वर्षांचा असतो, दरम्यानच्या काळात काही अडचणी येऊ शकतात. त्यामुळे तेव्हा आपल्याकडे आपत्कालीन निधी असायला हवा.
त्यामुळे गृहकर्ज घेताना ज्या किमतीचं घर खरेदी करतोय त्याच्या किमान 20% रक्कम संबंधित व्यक्तीकडे शिल्लक असणे आवश्यक आहे. म्हणजे 20% रकमेचं डाऊन पेमेंट केल्यास व्यक्तीवर अधिक आर्थिक ताण येणार नाही. याशिवाय गृहकर्ज घेणाऱ्या व्यक्तीनं त्याच्या पगाराच्या 40 ते 50% पेक्षा अधिक EMI होणार नाही याची दक्षता घेणं आवश्यक आहे. गृहकर्ज घेताना त्याची परतफेड करताना EMI भरताना जीवनातील इतर गोष्टींसाठी तडजोड करावी लागू नये.
50 लाखांचं गृहकर्ज घेतल्यास किती हप्ता द्यावा लागेल?
समजा एखाद्या व्यक्तीने 50 लाखांचे गृहकर्ज 20 वर्षांच्या मुदतीसाठी 9% व्याजदराने घेतल्यास त्याला दरमहा किती हप्ता भरावा लागेल हे जाणून घेणं आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीने 9% व्याजाने गृहकर्ज घेतले असल्यास त्याला 44,986 रुपयांचा हप्ता दरमहा भरावा लागेल. 50 लाखांचे कर्ज 20 वर्षात नियमितपणे परतफेड करायचे झाल्यास 57,96,711 रुपयांचे व्याज भरावे लागेल. म्हणजेच मुद्दलापेक्षा अधिक रक्कम व्याज म्हणून द्यावी लागेल. म्हणजेच परतफेड रक्कम ही 1 कोटी 7 लाख 96 हजार 711 रुपये इतकी होईल. समजा व्याज दर 8.5% असेल तर, 43,391 रुपयांचा हप्ता 20 वर्ष भरावा लागेल.
दरम्यान, गृहकर्ज घेतेवेळी व्याज दर कशा प्रकारे लागू करण्यात येणार आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. स्टॅटिक व्याज दर असेल तर, पूर्ण कर्जाच्या काळात तो कायम राहतो. मात्र, फ्लोटिंग व्याज दर असेल तर, तो नियमितपणे बदलत राहतो. यामध्ये व्याज दर कमी होत झाल्यास त्याचा फायदा कर्जदाराला होईल. मात्र, आरबीआयनं रेपो रेट वाढवल्यास त्याप्रमाणे कर्जाचा व्याज दर वाढेल, आणि यावेळी परतफेडीची रक्कम वाढू शकते.